नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित झाल्यानंतर मराठी विद्रोही संमेलन ही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवरती 15 वे विद्रोही साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिली आहे.
मराठी विद्रोही संमेलन स्थगित करण्याचा निर्णय -
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात 25 व 26 मार्च रोजी संविधानसन्मानार्थ 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमने-सामने आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रात कोरोना महामारीचे वाढते संकट गंभीरपणे घेत विद्रोहीच्या राज्य कार्यकारणीने आज नाशिक येथे संयोजन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली. चर्चेनंतर 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
तेंव्हाच विद्रोही साहित्य संमेलन होणार -
विद्रोही साहित्य संमेलन अध्यक्ष, ठिकाण, प्रमुख पाहुणे आत्ता जे ठरले आहेत तेच राहतील. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या तारखांनाच 15 वे विद्रोही संमेलन आयोजित करण्यात येईल व दरम्यान कोरोनाचे नियम पाळून संयोजन समितीच्या बैठका, पूर्व तयारी चालू राहील, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - लष्करी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी लष्करातील वरिष्ठ अधिकारी गजाआड