नाशिक - मालेगावमध्ये आणखी 13 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या 12 तासात एकूण 18 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 5 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात कोरोनाने कहर केलेला दिसून येत आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, नवीन सर्व रुग्ण हे आधीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटवर्तीय आहे. आजच्या मालेगावच्या धक्क्यानंतर जिल्ह्यात एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक शहरातील तीन, चांदवडमधील 1, पिंपळगाव नजीक येथील 1 आणि मालेगावमधील 27 रुग्णांचा समावेश आहे.
मालेगावमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, पिंपळगाव नजीकच्या एका रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. रात्री मालेगावमध्ये जे सात रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये एक 7 वर्षांची मुलगी, एक 10 वर्षांचा मुलगा, 38 वर्षांची महिला, एक 17 वर्षीय मुलगा व 40 वर्ष वयोगटातील पुरुष असल्याचे समजते आहे.