नाशिक - सटाणा तालुक्यात दुष्काळाचा आणखी एक बळी गेल्याची घटना घडली आहे. वटार येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मामाच्या शेतातून पिण्याचे पाणी आणताना एका ११ वर्षीय मुलाचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला. अक्षय नंदू गांगुर्डे, असे मृत मुलाचे नाव आहे.
सटाणा तालुक्यातील विरगाव येथे शिकणाऱ्या या अकरा वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिसरात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे. पाणी आणताना मुलाचा झालेला मृत्यू, ही तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी ठरली आहे. अक्षय नंदू गांगुर्डे सकाळी सात वाजताच्या सुमारास वडिलांसोबत वटार येथे मामाच्या मळ्यात टँकर भरण्यासाठी गेला होता. यावेळी परत येताना अक्षयचा तोल गेला आणि त्याचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला.
या घटनेमुळे सटाणा तालुक्यातील वीरगाववर शोककळा पसरली आहे. पाण्यासाठी एका अकरा वर्षीय मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.