नंदुरबार - शहादा तालुक्यातील भोंगरा गावात खुलेआम गावठी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढली आहे. या दारूविक्रीविरोधात गावातील महिलांनी आक्रमक रूप धारण केले आहे. महिलांनी गावात दारूबंदी व्हावी, दारू वितरकांचा बंदोबस्त करावा, यासाठी शहादा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी तहसीलदार मनोज खैरनार यांना घेरावही घातला.
यावेळी भोंगरा गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतल आहे. मात्र, दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचा ठराव झालेला असतानाही पोलीस प्रशासन या दारूबंदीकडे दुर्लक्ष का करत आहे? दारू विक्रेत्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.
अवैध दारूविक्रीमुळे या परिसरात अनेकवेळा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दारुमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, तरीही पोलीस प्रशासन व राज्य उत्पन्न शुल्क विभाग अवैध दारूविक्रीकडे दुर्लक्ष करत आहे.