नंदुरबार - दुष्काळग्रस्त शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत शेती करत आहे. पाणी टंचाईमध्येही ते पीक जगव आहेत. मात्र, त्यांचे हे कष्ट काहींच्या डोळ्यात खुपत असावे; नंदुरबार तालुक्यातील नळवे खुर्द गावातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ४ हजार ८०० पपईची झाडे अज्ञात माथेफिरूने तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नळवे खुर्द गावातील शेतकरी अशोक चौधरी यांच्या ३ एकर शेतातील २ हजार ८०० पपई पिकाची झाडे कापल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर कांतीलाल चौधरी यांच्या शेतातील २ हजार झाडांची कत्तल केल्याने २ लाखांचे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीतही मोठ्या कष्टाने जगवलेल्या पपई पिकाचे नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
घडलेल्या प्रकाराबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात यापूर्वीही, अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्री पोलिसांनी शेतात गस्त घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु, पोलीस प्रशासनाने या मागणीला गांभिर्याने घेतले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे गस्त घालण्याची मागणी करण्यात येणार आहे.