नंदुरबार- राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरु असलेल्या जन आशीर्वाद यात्रेतून कोरोना प्रसाराबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी टोला लगावला आहे. आम्ही घरात बसून काम करु शकत नाही आम्ही जनतेत जात आहोत. लोकशाहीने दिलेला अधिकाराचे आणि कोविड नियमांचे पालन करुन आम्ही जन आशीर्वाद यात्रा करत आहोत. आम्ही जनतेत जाणार कुपोषण, कोरोनाचे प्रश्न जाणुन घेणार असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला माफ करावे असा उपरोधात्मक टोला पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
'ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यु; अद्यापही खुलासा नाही'
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थीती अद्यापही चिंताजनक आहे. त्या जिल्ह्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याची गरज व्यक्त करत ईशान्येकडील राज्यांनी याची कडक अंमलबजावणी करत कोरोना आटोक्यात आणला असल्याचे मंत्री भारती पवार यांनी सांगितले. सर्वाधिक लसींचे डोस महाराष्ट्राला मिळाले असून राज्यात एक लाख डोस वाया गेले असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यु झाला याबाबत राज्याकडून केंद्राला अद्यापही काहीच माहिती मिळालेली नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहुन १३ ऑगस्टपर्यत आकडेवारी देण्यास सांगितले होते मात्र आपल्या राज्याकडून काहीच माहिती प्राप्त होत नसल्याचे देखील मंत्री भारती पवारांनी सांगितले आहे.
जीपीएल रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट -
जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार यांनी आज नंदुरबार शहरातील जे.पी.एन. रुग्णालयात जाऊन याठिकाणी लसीकरणाचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक जणांचे लसीकरण झाले असुन देशात ५६.६४ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण निर्मितीचे प्रमाण वाढले असून राज्यांनी आता लसीकरणाबाबत नियोजन करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.
नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाची केली पाहणी -
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत या ठिकाणच्या पोषण पुर्नवसन केंद्र व नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी स्तनदा माता यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि भोजनाबाबत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी महिलांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधा पुरेश्या आणि चांगल्या आहेत कि नाही याबाबत शहानिशा केली. यानंतर त्यांनी कुपोषीत बालकांची पाहणी देखील करत कुपोषणासाठी जिल्हा स्तरावर विशेष प्रयत्न करण्याची गरजही यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी पोषण पुर्नवसन केंद्रातील महिलांसोबत जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी स्थानिक आदिवासी भाषेतून संवाद देखील साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातच विविध आरोग्याच्या योजनांचा व कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा - नागपूर पोलिसांनी पाठवलेला अफगाणी नागरिक तालिबानी असल्याचा फोटो व्हायरल