नंदुरबार - नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून चोरीच्या दुचाकी कमी किंमतीत विकणार्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विसरवाडी येथील बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - मुंबई-दिल्लीतून रेल्वे प्रवास केलेले १२ प्रवासी सापडले कोरोना 'पॉझिटीव्ह'
विसरवाडी येथील बसस्थानक परिसरात एक जण मोटारसायकली कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यांनी पथकास पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने बसस्थानक परिसरात फिरून झाडाझडती घेतली असता, एक जण कमी किंमतीत दुचाकी विक्री करताना आढळून आला. यावेळी पोलीसांनी विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी खाकीवर्दी दाखविताच गणेश अशोक गवळी (वय 22, रा.देवळीपाडा ता.साक्री) असे नाव सांगितले.
आरोपीने वर्षभरापूर्वी चोरी मोटारसायकलची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर ताहराबाद, ब्राम्हणवेल, दुसाणे, नेर, सटाणा, व्यारा अशा विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच विसरवाडी, देवळीपाडा, कुहेर, विजयपूर येथूनही काही मोटारसायकली चोरी केल्याचे त्याने सांगितले. आरोपीकडून एकूण 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस शिपाई महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे यांच्या पथकाने केली.