नंदुरबार - जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख महामार्गांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गांच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात होत आहेत. महामार्ग लवकर दुरुस्त व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागपूर-सुरत महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून वाहन चालकांना याठिकाणी वाहन चालवणे अवघड झाले आहे. कोंडाईबारी घाटापासून ते नवापूरपर्यंत या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प असल्याने या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी महामार्ग खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने काही ठिकाणी वाहन फसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. महामार्ग प्राधिकरण या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष आहे. महामार्गाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या प्रमुख महामार्गावर नेत्रण- शेवाळी महामार्गावरील वरखेडी नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार तक्रारी करून ही राष्ट्रीय महामार्ग निर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नेत्रण-शेवाळी या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यातून रस्ता, अशी दुर्दशा या मार्गाची झाली आहे. नेत्रण-शेवाळी राष्ट्रीय महामार्ग हा अक्कलकुवा शहरातून जातो. गुजरात व मध्यप्रदेश ही राज्ये लागून असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक दिवस रात्र सुरू असते.
अक्कलकुवा व सोरापाडा या गावाला जोडणाऱ्या वरखेडी नदीच्या पुलाचीदेखील मोठ्या प्रमाणावर दयनीय अवस्था झाली आहे. पुलावरील लोखंडी कठडेदेखील तुटलेले आहे. ज्यामुळे वाहन चालक व पायी चालणारे नागरिक आपले जीव हातात घेऊन चालत आहेत. नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ लवकरात लवकर थांबवावा, यासाठी संबंधित विभागाने लवकरात लवकर रास्त्याची व पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.