नंदुरबार- लॉकडाऊन असताना आयशर टेम्पोतून अवैधरित्या सूरत मांडवी येथून पारोळ्याकडे जाणाऱ्या ७२ मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील धानोरा रस्त्यावर शहर पोलिसांकडून करण्यात आली. सर्व मजुरांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टेम्पोचे वाहनचालक व मालक यांच्यासह एका वीट भट्टीच्या मालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. त्याअनुषंगाने शहरातील धानोरा रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांना २ आयशर टेम्पोमध्ये (क्र.एम.एच.१८ बी.जी.३३७७, क्र. एम.एच.१८ बी.ए.०७११) ७२ मजूर आढळून आले. पोलीसांनी चौकशी केली असता हे मजूर सूरत मांडवी येथील वीट भट्टीवर काम करतात. वीट भट्टीच्या मालकाच्या सांगण्यावरून आपण या मजुरांना जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घेवून जात असल्याचे आयशर चालकांनी सांगितले. यावरून पोलिसांनी कारवाई करत दोनही टेम्पोमधील मजुरांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
पोलिसांनी वाहनचालक हेमंत सुशांत भदाणे व मालक प्रविण रविंद्र पाटील (दोघे रा.बांभोरी ता.धरणगाव), वाहनचालक गुलाब बुधा बिर्हाडे (रा.शेडावे ता.पारोळा) व मालक भूषण बाळू पवार (रा.सबगव्हाण ता.पारोळा) या चौघांसह वीटभट्टीचा मालक नासिरभाई (रा.जामनेर जि.जळगाव) या ५ जणांविरुद्ध भा.दं.वि च्या विविध कलमांसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम ३ आणि मोटारवाहन कायदा कलम ६६/१९२ नुसार गुन्हे दाखल केले आहे.
हेही वाचा- नवापुरात जामतलाव शिवारातील नाल्यातून खैर लाकूड जप्त; वन विभागाची कारवाई