नंदुरबार - वीज वाहिनीचा धक्का लागून दोन बालिकांसह तीन शेळ्या ठार झाल्याची घटना धडगाव तालुक्यातील भोगवाडे खुर्दे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
वीज वाहिनीचा धक्का लागून दोन बालिका ठार -
भोगवाडे खुर्दे गावापासून नजीक असलेल्या उदय नदी किनारी वीज वितरण कंपनीच्या मुख्य पोल वरुन स्थानिक शेतकर्याने लाकडी दांड्याच्या सहाय्याने वीज वाहिनी आपल्या शेतातील कृषीपंपापर्यंत पोहचवली होती. सोमवारी सकाळी गावातील हर्षला टेट्या पावरा (13), आरती देवसिंग पावरा (14) (दोन्ही रा. भोगवाडे खुर्दे) या दोघीही शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता वीज वाहिनीचा धक्का लागुन ठार झाल्या. त्यांच्या सोबत तीन शेळ्यांही ठार झाल्या आहेत.
ग्रामस्थांसह अधिकारी घटनास्थळी दाखल -
घटनेची माहिती गावातील रहिवाशी विजय पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिली. धडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक महाजन यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. धडगाव तहसिल कार्यालयाकडून मंडळाधिकारी आर.एल.पाडवी, तलाठी बी. एच. गांगुर्डे यांनी पंचनामा केला. देवसिंग शिवाजी पावरा यांच्या दोन तसेच टेट्या बुरद्या पावरा यांची एक शेळी दगावली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
परिसरातील विद्युत सेवा काही काळ खंडित -
धडगाव तालुक्यातील भोगवाडे खुर्दे येथे उघड्या असलेल्या विद्युत वाहिनीच्या धक्का लागल्याने बालिका व दोन शेळ्या ठार झाल्याने परिसरात सुमारे चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.