नंदूरबार - गुरुवारी काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्याभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुन या घटनेचा निषेध केला. तर काही ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळून मोर्चे काढण्यात आले.
शहादा शहर सराफ असोसिएशनच्या वतीने आज आपले सर्व व्यवहार बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढले. सरकारने आता दहशतवाद्यांच्या विरोधात आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. तसेच या हल्ल्यातील दोषीला भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणी सराफ असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आली. या मोर्चेत महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
अक्कलकुवा शहरात विविध मुस्लिम संघटनेच्या युवकांनी दहशतवादाचा पुतळ्याचे दहन केले. तर 'खून का बदला खून' अशा घोषणा देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. तर सर्वपक्षीय नेत्यांनी अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत पाकिस्तानचा झेंडा जाळला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.