नंदुरबार - सातपुड्याचा दुर्गम भागात झोपडी वजा कौलारू घरे असतात. पावसाळ्या पूर्वी या घरांच्या छताची आणि कौलांची दुरुस्ती करण्यात येत आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने घर दुरुस्तीस लागणारे साहित्य उपलब्ध होत नव्हते. आता मात्र जिल्ह्यात सकाळी ९ ते ५ सर्व दुकाने सुरु झाल्याने सर्व साहित्य मिळत आहे. त्यामुळे घरावर नवीन कौल बसवण्यात येत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने आता घरांच्या दुरुस्तीच्या कामांची लगबग वाढली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अतिदुर्गम भागात झोपडी वजा कौलारू घर असल्यामुळे पावसाळ्याच्या आधी या घरांची दुरुस्ती दरवर्षाप्रमाणे करण्यात येत असते. यात घराचे छप्पर म्हणजेच कौल बदलून त्याची दुरुस्ती पावसाळ्याआधी करण्यात येते. जेणेकरून पावसाचे पाणी घरात गळू नये, म्हणून कौल बदलले जातात. लॉकडाऊनमुळे कौल बदलण्यासाठी लागणारे साहित्य उशीरा उपलब्ध झाल्यामुळे घरांची दुरुस्ती मे महिन्याच्या अखेर होत आहे. अन्यथा ही दुरुस्ती एप्रिल महिन्यातच केली जात असते. म्हणून अखेर अतिदुर्गम भागातील नागरिक पावसाळ्या आधीच घरांच्या दुरुस्तीला लागले आहेत.