नंदुरबार - आदिवासी समाज सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सातपुड्यामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये येत्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळणार आहे.
आदिवासी समाज जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचे सांगितले जाते. इसवी सन १२४६ पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले पारंपारिक स्वरूप कायम ठेवून आहे. ढोल, बासरी आणि शिट्यांचा तालावर पारंपारिक पेहराव करुन आदिवासी काठी घेऊन नृत्य करतात. रात्रभर नृत्य कल्यानंतर पहाटे सूर्योदयापूर्वी ही होळी पेटवली जाते.
हेही वाचा - नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवींच्या हस्ते होलिकापूजन
होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष-महिला, गरीब-श्रीमंतीची आडकाठी मुळीच राहत नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात काठीची राजवाडी होळी धूम धडाक्यात साजरी होते. या सोहळ्याचे कुणालाही आमंत्रण दिले जात नाही. काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव स्वत:हून सामील होतात.
या सांकृतिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावतात. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव सातपुड्यातील आदिवासी समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे. त्याचे प्रमुख कारण ही काठीची राजवाडी होळी आहे.