मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होत्या. देशातील अनेकांनी मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी देव पाण्यात घातले होते. मोदी २.० सरकारचा आज पहिल्यांदा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे आणि खासदार हिना गावित यांचे नाव आघाडीवर आहे.
डॉ. हिना गावित यांच्या जमेच्या बाजू -
माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील गावित यांच्या नावाची शिफारस केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येतंय. आदिवासी महिला खासदार, तरूण आणि शिक्षणाने एबीबीएस अशा बाबी गावित यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या. त्या नंदुरबारमधून दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. त्यांची लोकसभेतील कामगिरीही भाजप नेत्यांच्या नजरेत भरली आहे. त्या भाजप नवमतदारांना आपलेसे करत आहेत.
हिना गावित यांचे शिक्षण -
हिना गावित यांची जन्मतारीख २८ जून १९८७ आहे. हिना गावित यांचे एम. बी. बी. एस., एम.डी. मेडिसिन जे जे कॉलेज मधून केले आहे. तसेच त्यांनी नंदुरबारमधून एल. एल बी.चे शिक्षणही पूर्ण केले आहे. त्याचबरोबर गावित यांनी संगीत विशारद ही पदवीही घेतली आहे.
कौंटुबिक पार्श्वभूमी -
भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी राष्ट्रवादी नेते विजयकुमार गावित हिना गावित यांचे वडील आहेत. तसेच पालघरचे शिवसेनेचे नेते राजेंद्र गावित हिना गावित यांचे चुलते आहेत. हिना यांना सुप्रिया गावित या बहीण आहेत. त्यांच्या आई किमुदिनी गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत.
खेळामध्ये योगदान -
विभागीय स्तरावरील अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग, आंतरशालेय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिनिधीत्व. हिना गावित यांनी राजकारणात येण्याआधी व खासदार असतानाही अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये कान-नाक-घसा तपासणी शिबीर, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर, दंत तपासणी शिबीर, डोळे तपासणी शिबीर, गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी आदि उपक्रम नंदुरबारमधील अनेक तालुक्यांत गावित यांनी राबविले आहेत.
पुरस्कार -
डॉ. हिना गावित यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमत सखी मंचचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर तब्बल चार वेळा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. हिना गावित यांची राजकीय कारकिर्द -
हिना नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार व राष्ट्रवादीचे माजी नेते डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आहेत. डॉ. हिना गावित यांचे वडिलांचा राजकारणातील मोठा अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा डॉ. हीना गावित यांना झाला आहे. डॉ. हिना यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असताना प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्य केले. त्यांच्या राजकारणाची सुरूवात युवक राष्ट्रवादीतून झाली. पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉ. हिना गावित संसदेतील सर्वात कमी वयाच्या खासदार आहेत. वडील विजय गावित राष्ट्रवादीकडून राज्यात कॅबिनेट मंत्री असताना हिना गावित यांनी २१ मार्च २०१४ रोजी राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नंदुरबार मतदारसंघातून १६ व्या लोकसभेसाठी सर्वात कमी वयाच्या खासदार म्हणून निवडून आल्या. २०१४ मध्ये मोदी लाटेत हिना यांनी नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांना पराभव केले. दुसऱ्यांदा सन 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढताना त्यांनी सात वेळेस आमदार असलेल्या ॲड. के. सी. पाडवी यांचा पराभव केला. दोन्ही वेळेस दिग्गज प्रतिस्पर्धी नेत्यांना त्यांनी पराभूत केले.
विजयकुमार गावित यांची राजकीय कारकिर्दी -
विजयकुमार गावित यांनी ६ सप्टेंबर २०१४ मध्ये एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. विजय गावित यांनी ७ नोव्हेंबर २००९ मध्ये राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून शपथ घेतली होती. विजयकुमार गावित १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९५ ते ९९ मध्ये ते आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री होते. त्यानंतर १९९९ ते २००४ मध्ये ते आदिवासी विकास राज्य मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ मध्ये ते आदिवासी विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर ते २००९ ते २०१४ मध्ये वैद्यकीय शिक्षण व अन्न पुरवठा मंत्री होते.
विविध केंद्रीय समितींमध्ये सहभाग -
2016 मध्ये हिना गावित यांना अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली गेली. 2014 हिना यांनी नंदुरबार मतदारसंघातून 9 वेळा खासदार राहिलेल्या मणिकराव होडलिया गावित यांना हरविले. मणिकराव यांच्या रुपाने काँग्रेसने 1967 पासून या जागेवर कब्जा केला होता. हीना यांनी 1,06,905 मतांनी विजय मिळवला. 2014 मध्ये आरोग्य आणि कुटूंब कल्याण समितीच्या सदस्या म्हणून निवडून गेल्या. त्याचबरोबर खाद्य व्यवस्थापन संयुक्त समितीच्या सदस्यही निवडल्या गेल्या.
खा. हिना गावित यांचे उल्लेखनीय कार्य -
2019 लोकसभा निवडणुकीत हिना गावित सलग दुसऱ्यांदा भाजपकडून खासदार म्हणून निवडून आल्या. संसदीय कामकाज करताना त्यांनी आरोग्य तसेच कुपोषणाच्या विषयावर मुद्देसूद मांडणी करत संसदेचे लक्ष वेधून घेतले. आदिवासी भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी उज्वला गॅस योजना अंतर्गत दीड लाखावर गॅस वितरण केले. खासदार गावित यांनी आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया न्युझीलंड, सिंगापूर, इंग्लंड स्वित्झर्लंड आदी परदेश दौरे संसदीय मंडळाच्या बरोबर केले आहेत. त्यांच्या संसदीय कामाची दखल घेत सलग पाचव्यांदा त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना वाचन, शास्त्रीय संगीत ऐकण्याचा छंद आहे. डॉ. हिना गावित यांनी संसदेत आतापर्यंत २४० प्रश्न विचारले.
खा. हिना गावित व जिल्हाधिकारी वाद -
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी करण्यात उपयुक्त ठरलेल्या विविध प्रयोगांची राज्यासह देशात दखल घेतली गेली. या नियोजनात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. नंदुरबार पद्धतीची सर्वत्र चर्चा होत असताना भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे.
नंदुरबार जिल्ह्य़ात सुरू झालेला हवेतून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प, प्राणवायू परिचारिका योजना, रेल्वेतील खास पद्धतीचे विलगीकरण कक्ष आदींचा संपूर्ण राज्यात गवगवा झाला. इतकेच काय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील नंदुरबारमधील करोना स्थिती काहीशी आटोक्यात येत असल्याचे सांगितले. करोना विरोधातील लढाईत नियोजनपूर्वक काम सुरू असताना दुसरीकडे नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका मांडली. गरज नसताना शाळा सुरू ठेवण्याच्या अट्टहासातून कोरोनाचा प्रसार झाला. ते समोर येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रसार माध्यमांना चुकीची माहिती देत असल्याचा खा. गावित यांनी आक्षेप नोंदवला. नंदुरबार रोटरी वेलनेस सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून उसनवारी तत्त्वावर दिलेल्या एक हजार रेमडेसिविरनंतर हा वाद अधिकच चिघळला.
हिना गावित यांच्या संसदेतील भाषणाचा पंतप्रधान मोदींकडून उल्लेख -
डॉ. हिना गावित यांच्या संसदेतील भाषणाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात केला होता. २०१९ मध्ये 31 वर्षीय डॉ. गावित सलग दुसऱ्यांदा भाजपच्या खासदार बनल्या. त्यावेळी हिना यांनी लोकसभेत भाषण करताना म्हटले, की 'नंदूरबार मध्ये मी आरोग्य शिबीराचे आयोजन करत होते. त्यावेळी एक ७२ वर्षीय वृद्धा भेटली. ती अंध होती. मी तिला विचारले की, किती वर्षापासून तुला दृष्टी नाही. तिने सांगितले, की लहानपणापासून मी अंध आहे. तपासणीमध्ये समजले की, कुपोषणामुळे कैट्रॅक्ट(मोतियाबिंदू) समस्येमुळे डोळ्याची दृष्टी गेली आहे. जेव्हा या महिलेचे यशस्वी ऑपरेशन झाले त्यावेळी माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिने हातातील काठी फेकून दिली व सर्व काही पाहू लागली. हिना म्हणाल्या की, ती महिला काँग्रेसची वास्तव स्थिती आहे. नेता तो नसतो जो भाषण देतो, नेता तो असतो जो गरिबांच्या घरांत राशन देतो. हिना गावित म्हणाल्या की याआधी सरकार अँटी इन्कमबन्सीवर बनत होते पहिल्यांदाच प्रो- इन्कमबन्सीवर बनले आहे.
नंदुरबार मतदार संघाची स्थिती -
हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता. या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या प्रचाराची सुरूवात केली जायची. हा मतदारसंघ काँग्रेसच्या माणिकराव गावित यांनी ४२ वर्षे राखला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हिना गावीत यांनी भाजपात प्रवेश करून ही जागा जिंकली होती. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. हे तालुके सातपुडाच्या दुर्गम भागात असून या ठिकाणी अनेक समस्या आहेत. दुर्गम भागात अजूनही रस्ते, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सिंचन, कुपोषण आणि स्थलांतर या मुख्य समस्या आहेत.
गावित कुटूंबात गृहकलह -
नंदुरबारमध्ये गावित परिवारातील गृहकलह पाहण्यास मिळतो. विजयकुमार गावित यांचे दोघे भाऊ माजी आमदार शरद गावित आणि राजेंद्र गावित डॉ. गावितांना या ठिकाणी तेही आव्हान निर्माण करताना दिसतात.
हिना गावित यांचा साखरपुडा -
नंदुरबार जिल्ह्यातील खासदार डॉ. हिना गावित यांचा मुंबई येथील डॉ. तुषार अमरसिंह वळवी यांच्याशी २०२० मध्ये साखरपुडा झाला. मात्र, दोघे विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच डॉ. वळवी यांचा मुंबईतील लीना रतनसिंग वसावे नामक तरुणीशी साखरपुडा झाल्याचे समोर आले. लीना वसावे यांनी बोरिवलीच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने हिना व तुषार यांचा विवाह मोडला.
खासदार हीना गावित यांच्यावर नामुष्की -
खा. हिना गावित यांनी बंधपत्र रुग्णसेवा पूर्ण न केल्याने ‘एमडी’ची पदवी २०१७ मध्ये परत करावी लागली होती. पदवी रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल घेत असते. जे. जे. रुग्णालयातून खा. हीना गावित यांनी मेडिसीन या विषयामध्ये २०१४मध्ये ‘एमडी’ची पदवी प्राप्त केली. मात्र त्यानंतर सरकारी रुग्णालयात करण्यात येणारी बंधपत्र रुग्णसेवा (बॉण्ड) गावित पूर्ण करू शकल्या नाही. त्यामुळे जेजे रुग्णसमूह प्रशासनाने गावित यांनी पदवी परत करावी, असे निर्देश देणारे पत्र पाठवले. या पत्राला उत्तर देताना त्यांनी ही पदवी परत करू, असे कळवल्याचे जे. जे. रुग्णसमूहाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी
मराठा आरक्षणासाठी धुळ्यात कारवर हल्ला -
धुळे जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी भाजपच्या खासदार हिना गावित यांच्या कारवर २०१९ मध्ये हल्ला केला. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ही घटना घडली. यामध्ये गावित यांच्या कारचे नुकसान झाले.