नंदुरबार - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात नवीन रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना दवाखान्याच्या बाहेर अथवा घरीच उपचार घ्यावा लागत होता. याकरिता जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने रेल्वे कोविड कोच नंदुरबारात पाचारण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसातच रेल्वेत लागणाऱ्या योग्य साधनसामग्रीसह सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानाची धकधक लक्षात घेता तापमान समतोल राहावे म्हणुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आली आहे. आज या कोचमध्ये पहिल्याच दिवशी 18 रुग्णांनी उपचार घ्यायला सुरवात केली आहे. सुमारे 400 पेक्षा अधिक रुग्ण या कोविड कोचमध्ये उपचार घेऊ शकतील अशी सुविधा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.
३१ कोविड कोचमध्ये उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण कमी असल्यामुळे प्रशासनाद्वारे परिस्थिती नियंत्रणात होती. परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यू दर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु त्यात देखील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी महाराष्ट्र शासनाकडे रेल्वे कोवीड कोच (आयसोलेशन वॉर्ड) ची मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नंदुरबार रेल्वे स्थानकात ३१ डब्यांची द्वितीय श्रेणीची रेल्वे गाडी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पाठवली आहे.
पहिल्या दिवशी 18 रुग्ण दाखल
रेल्वे कोविड कोच सेंटरमध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवशी 18 रुग्ण दाखल झाले आहे. एकलव्य कोवीड सेंटरमधील कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना रेल्वे आयसोलेशन वार्ड मध्ये शिफ्ट करण्याचे काम देखील सुरू असल्याचे डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
जेवण, चहा, नाश्तासह मोफत उपचार.
जिल्हा प्रशासनाद्वारे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी 24 तास डॉक्टर्स, कर्मचारी, सुरक्षारक्षक उपलब्ध केले आहेत. रुग्णांना जेवण, चहा, नाष्टा व उपचार मोफत दिले जात असुन वाढत्या तापमानामुळे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वेच्या छतावर गोणपाट टाकून पाणी शिंपडले जात आहे. तर प्रत्येक कोच जवळ कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे आयसोलेशन वार्ड मध्ये मिळत असलेल्या सुविधा व डॉक्टर देखील मित्राप्रमाणे सर्व गोष्टींची काळजी घेऊन उपचार देत असल्याने रुग्णांनी आनंद व्यक्त केला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह झोनल ऑफिसरची नियुक्ती
रेल्वे कोविड कोच मध्ये अक्कलकुवा जामिया येथील डॉ.सैय्यद अरसलान अहेमद, डॉ.ज़ाहिद अन्सारी, डॉ.राजपूत उमर यांची नेमणूक करण्यात आली आहे. रेल्वे कोवीड कोचमध्ये सेवा देताना आमच्या जीवनातला हा वेगळा अनुभव असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. तर प्राध्यापक डॉ. दिनेश देवरे, कमलेश अहिरे, एस. बी. पवार, बी.एस. कपूरे यांची झोनल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आल्याने रुग्णांना चांगली सेवा देण्याचे काम पार पडत आहे.
योग्य ती सुरक्षा व्यवस्था
फलाट क्रमांक तीन वर उभ्या असलेल्या या कोविड कोचला व फलाट क्रमांक तीनला संपूर्ण मंडप लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर येणाऱ्या रेल्वेतील प्रवाश्यांचा व रुग्णांचा संपर्क होणार नाही, तसेच कोविड कोचमध्ये रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - पुतण्याच्या लसीकरणावरून देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर! काँग्रेसने केली टीका