नंदुरबार - हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे, कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता विविध प्रयोग राबवले जात आहेत. यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी खान्देशी भाषेत व आदिवासी भाषेत नागरिकांमध्ये जनजागृती केली. लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी याकरिता जिल्हा प्रशासनाने सोबतच शिक्षण विभाग देखील खांद्याला खांद्या लावला आहे. एका जिल्हा परिषद शिक्षकाने वेगवेगळे बहुरूप धारण करून नागरिकांना समजेल त्या भाषेत लसीकरणाबाबत जनजागृती केली व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात शिक्षक यशस्वी देखील झाले आहेत.
मुख्याध्यापकांनी धारण केले बहुरूप
शहादा तालुक्यातील बिलाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक, ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करत आहेत. ते वेगवेगळे रूप धारण करून नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांमध्ये असलेल्या लसीकरणाचे गैरसमज दुर करुन, त्यांच्यातील लसीकरणाचे भय काढुन टाकण्यासाठी हे शिक्षक चक्क बहुरुपी बनले आहे. कधी वासुदेव, तर कधी शंकर भगवान तर कधी पोलीस कर्मचारी बनुन ते गावातल्या लोकांचे लसीकरण प्रबोधन करत आहेत.
ग्रामीण भागात मुख्याध्यापकांनी केले ग्रामस्थांना आकर्षित
रस्त्यावर नाचुन लस प्रबोधन करणारे हे वासुदेव खरे खुरे वासुदेव नाहीत. तर ते नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बिलाडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेच मुख्याध्यापक आहेत. मुख्याध्यापक असलेले सचिन पत्की वासुदेव, कधी शंकर देव तर कधी पोलीस अधिकारी असे विविध बहुरुपींचे धारण करुन जनजागृती करत आहेत. सध्या हे बिलाडी आणि बामखेडा या दोन गावातील विद्यार्थी आणि गावकऱ्यांची आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाबाबत काहीसे भितीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांमधील गैरसमज केला मुख्याध्यापकांनी दूर
लसीकरणाबाबतचे आदिवासी बहुल भाग आणि ग्रामीण भागीतल गैरसमज दुर करण्याची जबाबदारी ही त्या गावातल्या शाळा शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे गावातल्या लोकांना लसीकरणाचे महत्व विषद करुन घेण्यासाठी बिलाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. वासुदेव, शंकर, तर कधी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रातुन सचिन पत्की हे कोरोना लसीकरणाबाबत गावकऱ्यांचे प्रबोधन करत आहे.
जनजागृतीसाठी मुख्याध्यापकांह शिक्षक उतरले रस्त्यावर
सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातुनच शिक्षक विद्यार्थ्यांसोबत जोडले जात आहे. अशातच गावच्या शाळेचे शिक्षक, अशी विविध बहुरुप्याचे रुप धारण करुन घरासमोर आल्याने विद्यार्थ्यांची मोठी करमणुक होत आहे. तर गावकरी आणि ग्रामस्थांची लसीबाबतची भितीही दुर होत आहे. सचिन पत्की यांना या सगळ्या कामात शाळेतील अन्य दोन शिक्षक, गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा ताईंची देखील मोलाची मदत मिळत आहे. त्यामुळेच गावातल लसीकरणाबाबतचे गैरसमज दुर होवुन, आता दर गुरुवारी लोक लसीकरणासाठी पुढाकार घेतांना दिसत आहे. त्यामुळे बामखेडा आणि बिलाडी गावात लसीकरणाचा आकाडा वाढतांना दिसत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले बहुरूपी मुख्याध्यापकांना प्रोत्साहन
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पत्की यांनी नागरिकांना आवडेल या रूपात नागरिकांची लसीकरणाबाबत जनजागृती करून गैरसमज दूर केले. पत्की यांचा हा प्रयोग पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिक्षण विभागासह मुख्याध्यापकांचे कौतुक केले. त्याचबरोबर अशाप्रकारचे प्रयोग जिल्हाभर राबवावेत असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांनी वाटप केले मास्क, सॅनिटायझर, साबण
सचिन पत्की हे नुसतेच लसीकरणाचे प्रबोधन न करता त्यांच्याकडे असलेल्या वासुदेवाच्या गाठोडीतुन लोकांना स्वखर्चाने मास्क, सॅनिटायझर आणि हात धुण्याचे महत्व विषद करुन मास्क, सॅनिटायझर व हात धुण्याचे साबन वाटप करत आहेत.
जनजागृतीनंतर लसीकरणाला ग्रामस्थांचा प्रतिसाद
बिलाडी व बामखेडा गावात दर गुरुवारी लसीकरण केले जाते. या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण झाला होता. त्याकरिता मुख्याध्यापकांनी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी राबविलेला प्रयोग यशस्वी होतांना दिसून येत आहेत. शिक्षित व अशिक्षित ग्रामस्थ लसीकरण केंद्राकडे आकर्षित होत आहेत व स्वतःहून लसीकरण साठी आपले नाव नोंदवत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी धारण केलेल्या वासुदेव रुपी बहुरूपामुळे बिलाडी व बामखेडा गाव सध्या जिल्ह्यात चर्चेस आले आहे.
हेही वाचा - LIVE UPDATES : गोकुळ दूध संघ निवडणूक; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात