नंदुरबार - नवापूर शहरातील काही युवक चरणमाळ घाटातील काका काकी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यांच्यापैकी एक २२ वर्षीय युवक बेपत्ता झाला होता. गुराख्याला जंगलातील एका तळ्यात तरुणाचा मृतदेह तरंगतांना आढळला. महंमद घरैया असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नवापूर शहरातील व्यापारी अब्दुलभाई घरैया यांचा मुलगा महंमद हा आपल्या मित्र व नातेवाईकांसोबत रविवारी चरणमाळ घाट परिसरातील सप्तशृंगी स्थान असलेल्या काका काकी धबधबा येथे सहलीला गेला होता. सांयकाळी सहलीचा आनंद घेतल्यानंतर सर्व युवक आपल्या वाहनाजवळ आले. मात्र महंमद दिसला नाही. त्यामुळे त्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. युवकाचे नातेवाईक आणि नवापूर शहरातील युवकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता.
अखेर शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईकांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्पळ ठरला होता. 48 तासानंतर बेपत्ता युवकाचा मृतदेह सकाळी गुरे चारणार्या व्यक्तीला दिसल्याने त्याने स्थानिक पोलीस पाटील यांना कळवले.
बोरझर येथील पोलीस पाटील यांनी नवापूर पोलिसांना दूरध्वनीद्वारे मृतदेह धबधब्याजवळ पाण्यात तरंगत असल्याचे कळवले आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तासानंतर जंगलातील तळ्यातून युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बेपत्ता झालेल्या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.