नंदूरबार - लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत होता. त्यातच भर म्हणजे वाढलेलं तापमान. नंदूरबार जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. सूर्य आग ओकू लागला असून नंदूरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमान 41 अंश सेल्सिअसवर स्थिरावलं असलं तरी वाढत्या तापमानामुळे जीवाची लाही-लाही होत आहे. नंदूरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे नागरिक हैरान होते मात्र, आता उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत.
उन्हापासून संरक्षणासाठी असलेली गॉगल, टोपी, रुमाल विक्रीची दुकाने बंद असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे शीतपेयाची दुकानेही बंद असल्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिक एसी व कुलरचा वापर करत आहेत. उष्णतेमुळे बळीराजा अधिक संकटात सापडला आहे. मे महिन्यात केळी, पपई तसेच कपाशीची लागवड नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, उष्णतेमुळे लागवड केलेली केळी व पपई जळून खाक झाली आहे. तर कपाशीचे कोणच फुटले नाही. यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आता उन्हाची तीव्रता कमी होण्याची वाट पाहत असून, ऊन कमी झाल्यावरच शेतीचे काम पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.