नंदुरबार- नवापूर शहरातील शिक्षक दाम्पत्य महेश पुरकर व प्रतिक्षा पूरकर यांनी लग्नाचा 24 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. जगात कोरोना महामारीने थैमान घातल्याने याचा सर्वाधिक फटका कामगार, मजूर वर्गाला बसत आहे. पूरकर दाम्पत्याने 40 गरजू कुटुंबाना मदत केली. रोज कमावून उपजीविका भागवणाऱ्यांना कुटुंबाना यामुळे मदत मिळाली आहे.
महेश पुरकर व प्रतिक्षा पूरकर शहरातील साई नगरीत राहतात. ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी बुद्रुक येथे कार्यरत आहेत. त्यांनी लग्नाचा 24 वा वाढदिवस गोरगरीब, मोलकरणी, गरजू लोकांना संसार उपयोगी साहित्य वाटप करुन साजरा केला. नवापूर शहरातील स्वामीनारायण मंदिरातच्या आवारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्वांना साहित्य वाटप केले. यात नवापूर शहरातील देवल फळीतील व इतर 40 गरीब गरजू कुटुंबाना मदत करण्यात आली.
डाळ, तांदुळ, तेल, चहा, साखर, साबण, मीठ, मिरची, मसाला, बिस्कीट, चिवडा तोंडाला लावण्यासाठी मास्क अशा पद्धतीने कीट तयार करून देण्यात आली. या कार्यक्रमावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे देखील पालन करण्यात आले.
लग्नाचा वाढदिवस अनेकजण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतू, पुरकर दांम्पत्याने सामाजिक भान राखत अनोख्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याने अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.