नंदुरबार - भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. सुहास नटावदकर यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून नटावदकर यांची मुलगी समीधा नटावदकर यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे जनसामान्य कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे सुहास नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
डॉ. सुहास नटावदकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. २००० सालापासून ते नंदुरबार भाजप जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील भाजपचे जुने कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी भाजप पक्षाकडून तसेच अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले.
२०१४ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून हिना गावित यांनी उमेदवारी मिळवली होती. यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले होते. २०१९ च्या निवडणुकीतही भाजपाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या नाराजीचे सूर आता अपक्ष उमेदवारीत रूपांतरीत होत आहे. याचा फटका जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.