नंदुरबार - स्ट्रॉबेरीचे नाव घेतले की महाबळेश्वरची आठवण येते. त्याठिकाणी मिळणाऱ्या रसाळ आणि चवीच्या स्ट्रॉबेरीचा स्वाद आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. मात्र, आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला टक्कर देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे राज्यातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. अनेक पाडे मिळून या तोरणमाळ गावाने आकार घेतलेले आहे. या परिसरात तापमान बऱ्यापैकी कमी असते. सातपुड्यातील उंचावर हा भाग असल्याने येथील वातावरणात नेहमी गारवा असतो. या वातावरणाचा फायदा घेत येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षापासून येथील शेतकरी यशस्वी स्ट्रॉबेरी लागवड करून लाखोंचा नफा कमवत आहे. तोरणमाळ गावाचे रहिवासी सुशांत चव्हाण यांनी अडीच एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन स्वतः रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे सातपुड्याच्या खोऱ्यात उत्पादित या स्ट्रॉबेरीची चव ही लाजवाब आहे. तोरणमाळ परिसरात येणारा पर्यटक सुशांत चव्हाण यांच्या थेट शेतावरच येऊन स्ट्रॉबेरीची खरेदी करतात. २०० रुपये प्रतिकिलो दराने ही स्ट्रॉबेरी विकली जाते. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड यशस्वी करून आपल्या जीवनमानात बदल घडवून आणला आहे.