नंदुरबार - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी बकरी ईद आणि आणि हिंदू धर्मीयांनी गोपाळकाला सण घरातच आनंदाने साजरा करावा. दरम्यान कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, सुरक्षीत अंतर राखण्याचीही सर्वांची जबाबदारी आहे. अनेक सण-उत्सव श्रावण महिन्यात येत असल्याने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता समाज बांधवांनी घरातच सण-उत्सव साजरे करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी केले.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक भापकर, पोलीस निरीक्षक पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले, यावर्षी देशावर कोरोनाचे संकट आहे. या संकटकाळात सर्वांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सामाजिक सलोखा ठेवणे गरजेचे आहे. यामुळे शासनाच्या नियमानुसार सण-उत्सव साजरे करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सण-उत्सव साध्या पद्धतीने व नियमांचे पालन करीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरे करावे लागणार आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सण-उत्सव साध्या पद्धतीने व शासनाच्या नियमानुसार साजरा करावे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला सामूहिक नमाज पठणासाठी एकत्र न येता घरातच राहून नमाज अदा करावी. तसेच हिंदू बांधवांनी देखील नारळी पौर्णिमा गोपाळकाला हे सण उत्सव देखील सार्वजनिक उत्सव म्हणून साजरे न करता घरातच साजरे करावे.
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनीही बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. तसेच पोलिस उपअधीक्षक रमेश पवार यांनी शासनाच्या नियमांची माहिती देऊन सण-उत्सव कसे साजरे करावेत, याविषयी सांगितले. शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी आभार मानले. या बैठकीला शांतता समितीचे सदस्य व शहरातील सर्व मौलाना विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.