नंदुरबार - ऐन पेरणीच्या काळात युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुबलक खते उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र, आता ऐन पेरणीच्या काळात आता जिल्ह्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. पेरणीसोबत युरिया खत महत्वाचा घटक आहे. बियाण्यासोबत युरिया खताचा वापर केला जात असतो. मात्र, शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात खते उपलब्ध नसल्याने खतासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा - शेअर्समध्ये अफरातफर करून वृद्धाची 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
तर याबाबत खत विक्रेत्यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यात खताचे रॅक उपलब्ध होत नसल्याने युरिया टंचाई निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात २ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उदिष्ट होते. आतापर्यंत १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, आता जिल्ह्यात कुठेही युरिया मिळत नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी युरिया उपलब्ध होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.