नंदुरबार - शहरात गणेशमूर्ती बनवणारे लहान-मोठे दोनशेपेक्षा अधिक कारखाने आहेत. मात्र, कोरोना काळात राज्य सरकारने गणेशोत्सवात चार फूटांपेक्षा मोठ्या मूर्तींना परवानगी नाकारली. त्यामुळे कारखान्यात तयार केलेल्या हजारो गणेशमूर्ती तशाच आहेत. त्यामुळे मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आता या मूर्तींचे करावे काय, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे.
नंदुरबारमधील गणेशमूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये एका फुटापासून तर सतरा फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक मोठ्या गणेशमूर्ती या कारखान्यात तयार झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत मंडळांनी चार फुटापर्यंतच्या मूर्ती बसवल्यात. त्यामुळे आता मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे काय करावे? असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. १० फुटापुढील एक मूर्ती तयार करण्यासाठी १० ते १२ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असतो. अशा हजारो मूर्ती तयार केलेल्या आहेत. यावर मूर्तिकारांनी लाखो रुपयांच्या भांडवलाची गुंतवणूक केली. मात्र, यावर्षी एकही मोठी मूर्ती विक्री न झाल्याने मूर्तिकारांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे, सरकारने मदत करावी अशी मागणी मूर्तिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.