नंदुरबार - जिल्ह्यात आज (गुरूवार) शाळा महाविद्यालयांची घंटा वाजली असुन, गेली दीड ते दोन वर्षे शाळेपासुन दुर राहणारे विद्यार्थी आज शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभुती घेण्यासाठी उत्साहात दाखल झालेले दिसुन आले. कोरोनाच्या निर्बंधात सुरु झालेल्या शाळा आणि त्यातच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.
जिल्ह्यात 339 शाळा सुरू -
महाराष्ट्र शासनाने शाळा सुरु करण्याच्या परिपत्रकानुसार आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक शाळांसुरु झाल्या असुन आज पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमध्ये उपस्थित असल्याचे चित्र दिसुन आले. नंदुरबार जिल्ह्यात 8 ते बारावी दरम्यान 339 शाळा असुन यात जवळपास 90 हजार 885 विद्यार्थी आहेत. मात्र शाळा उपस्थितीबाबत असणारे निर्बधांमुळे आज ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करत शाळांनी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावल्याचे चित्र होते. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर थर्मामीटरद्वारे त्याची तपासणी सॅनिटायझेशन करुन वर्गात एक बाक सोडून एक विद्यार्थी अशी खास बैठक व्यवस्था देखील करण्यात आली होती. यासाठी शिक्षण विभागासह शाळा व्यवस्थापनाने खास मेहनत केल्याचे दिसुन आले.
समस्यांचे निराकरण करणे सोपे जाते - विद्यार्थी
गेली वर्षे दीड वर्षे विद्यार्थी मोबाईल आणि संगणकाद्वारेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. त्यात त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यात त्यांना बऱ्याच तांत्रिक उडचणी देखील येत होत्या. आणि शाळा आणि वर्ग मित्रांना मीस करण्याचे दुख: ही वेगळे. त्यामुळेच आजपासुन प्रत्यक्षात शाळा सुरु होणार असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाच्या अनुभुतीसह आपल्या सख्या सवंगड्यांना भेटण्याचा आनंदाने भारावलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मास्क सारखे निर्बंध असले तरी चालेल मात्र प्रत्यक्ष शाळेत जावुन शिक्षण घेण्याचा आनंद आणि मज्जा काही वेगळीच असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्याकडुन पहायला मिळाल्या.
सूचनांचे पालन करणे गरजेचे
शाळा सुरु झाल्याची घंटा वाजली असली तरी कोरोनाच्या सर्व बाबीतुन ही धोक्याची घंटा ठरु नये यासाठी शाळा व्यवस्थापनासह साऱ्यांनीच मेहनत घेण्याची गरज आहे. नाहीतर शाळा सुटली आणि पाटी फुटली अशीच काहीशी गत होवुन शिक्षण विभागाचा हा निर्णय अंगलट येण्याची भिती व्यक्त होत आहे. शासनाने दिलेल्या योग्य पालन झाल्यास व उपाय योजना झाल्या तर शिक्षण पद्धती पूर्ववत होईल.