नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी असताना देखील बिनधास्तपणे वाळूची वाहतूक सुरू असल्याने नवापूरसह नंदुरबार तालुक्यातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारी 64 वाहने जप्त करण्यात आली आहेत. नंदुरबार येथून 7 तर, नवापूर येथे 57 वाळूची वाहने जप्त केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा आणि जिल्ह्याअंतर्गत वाळू वाहतुकीवर बंदी घातली असतानासुद्धा वाळूमाफियांनी मात्र बिनधास्तपणे चोरट्या मार्गाचा अवलंब केला.
वाळू माफियांनी ही बेकायदेशीर वाहतूक सुरूच ठेवली होती. नंदुरबार महसूल प्रशासन तसेच नवापूर महसूल प्रशासन आणि पोलिसांनी ही कारवाई केली. गुजरात राज्यातील निझर येथील वाळू भरून नंदुरबार शहराला लागून असलेल्या नवापूर परिसरातून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, चाळीसगाव येथे नेण्यात येत होती.
नवापूर महसूल प्रशासन तसेच नवापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुजरात राज्यातून नवापूरमार्गे वाळू घेऊन जाणारे वाहने जप्त केले. त्यानंतर हे सर्व ट्रक तहसील आणि पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले. त्यामुळे परिसरात ट्रकचालकांची गर्दी झाली होती. यापूर्वी नवापूर महसूल व पोलीस प्रशासनाने वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारी 85 वाहने जप्त केली होती. त्यापैकी 26 वाहनांवर प्रत्येकी 2 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई न्यायालयाने केली आहे.