नंदुरबार - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या हल्ल्याबाबत सरकारने तत्काळ पावले उचलून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (एकतावादी) यांच्यासह विविध संघटनेतर्फे याबाबतचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी धनंजय घोगाटे यांना देण्यात आले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील फुलझाडे, सीसीटीव्ही कॅमेर्यांची तोडफोड झाली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर त्यांच्या संग्रहातील पुस्तकांसाठी बांधले होते. जगभरातील आंबेडकरी अनुयायी येथे दररोज भेटीला देत असल्याने ते महत्त्वाचे स्थान आहे. अशा या 'राजगृह'वर हल्ला करुन तोडफोड करण्यात आली आहे. सरकारने तत्काळ कारवाई करुन हल्लेखोरांना जेरबंद करावे, असे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी धनंजय घोगाटे यांना देण्यात आले.
याप्रसंगी आरपीआर एकतावादी जिल्हाध्यक्ष दिपक बागले, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष रसिकलाल पेंढारकर, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष सौरभ सरोदे, भिमपुत्र युवासेना संस्थापक अध्यक्ष अमोल पिंपळे, आरपीआर (गवई) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, कैलास पेंढारकर तसेच जर आदिवासी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, एकलव्य आदिवासी क्रांतीदल महाराष्ट्र राज्य आदी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सह्या केल्या.