नंदुरबार - नवापूर तालुक्यातील खोकसा येथील दोन घरांमध्ये अवैध लाकूड फर्निचरचा कारखाना सुरू होता. या कारखान्यांवर नवापूर वनविभागाने छापा टाकून 8 लाखांचा लाकूडसाठा व फर्निचर जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करीच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. तीन तास चाललेल्या या कारवाईने लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी.. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सील
मिळालेल्या माहितीच्या आधारे खोकसा गावातील चंदू गावित व रमेश गावित यांच्या घरी वनविभागाने छापा टाकला. यावेळी घराची झाडाझडती घेतली असता सागवान नग, गोल व चौपट सागवान, असे एकूण 8 घनमीटरचा लाकुडसाठा, रंधा मशीन, दोन डिजाईन मशीन, असे एकूण आठ लाखांचे साहित्य मिळून आले. ही कारवाई नवापूर वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला होता. तीन तासांच्या कारवाईत 8 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त करून तो पाच ते सहा वाहनांमध्ये भरून नवापूर वन आगारात जमा करण्यात आला.
नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्करीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत. यात आंतरराज्यीय मोठ्या टोळीचा समावेश असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली.
विविध प्रजातीचे लाकूड जप्त
घरांमध्ये सागवान, सिसम, खैर, शिवण या लाकूडने फर्निचर तयार करून महाराष्ट्रासह गुजरात राज्यात अवैधरित्या वाहतूक केली जात होती. त्यामुळे, ही आंतरराज्यीय टोळी असल्याने तिचा पर्दाफाश करण्यात आला.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई वन उपविभागीय अधिकारी धनंजय पवार यांच्या आदेशानुसार चिंचपाड्याचे वनक्षेत्रपाल आर.बी. पवार, वनक्षेत्रपाल प्रशांत हुमणे, गस्ती पथक रत्नपारखे, नवापूर विभागाचे कर्मचारी यांनी केली.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी.. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सील