नंदुरबार - राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजपातर्फे राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
नंदुरबार येथे खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप यावेळी खासदार हिना गावित यांनी केला. शहरातील नवापूर चौफुलीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांच्यावतीने मोर्चा काढणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर रोखण्यात आले. भाजपा महिला आघाडीच्या शिष्टमंडळांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले.