नंदुरबार :- मुंबईच्या नायर रुग्णालयातील आत्महत्या केलेल्या डॉक्टर पायल तडवीला न्याय मिळावा. त्याच सोबत नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतमजूर कुटुंबांना स्वस्त धान्य मिळावे. वनाधिकार कायद्यातील प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लावावीत, आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.
मोर्चात आदिवासी दुर्गम भागातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. पायल तडवी ही जातीयवाद शक्तींना बळी पडलेली आदिवासी विद्यार्थिनी असून, या प्रकरणातील दोषी वरिष्ठ अधिकाऱयांचीही चौकशी करण्यात यावी. त्याचसोबत उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
दुर्गम भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतमजुरांना हाताला कामधंदा नाही. म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून प्रत्येकाला महिन्याला 35 किलो धान्य द्यावे अशा मागण्या मोर्चेकऱ्यांच्या होत्या. नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्यानंतर त्याठिकाणी सभा होऊन शासनाचा निषेध करण्यात आला.