नंदुरबार - तळोदा तालुक्यातील नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीत प्रकल्पबाधितांना अद्यापही शासनाकडून घरप्लॉट मिळाले नाहीत. त्यामुळे संतप्त प्रकल्पबाधितांनी आज वसाहतीत आंदोलन करत जेसीबीने जमीन सपाट करून घरप्लॉटचा ताबा घेतला.
तळोदा तालुक्यातील नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीत जवळपास ९० प्रकल्पबाधित १९९४-९५ पासून मोकळ्या जागेत राहत आहेत. शासनाने घरप्लॉट न दिल्यामुळे ते नाईलाजास्तव तेथे राहत आहेत. या प्रकल्पबाधितांच्या शिफ्टिंग पासवर मूळ गावातून सोमावल गावाठाणात स्थलांतर करत असल्याचे नमूद आहे. असे असूनही त्यांना घरे देण्यात आले नाही. तर काही प्रकल्प बाधितांना दिलेल्या घरप्लॉटच्या ताबा पावतीवर असलेल्या नंबरचा घरप्लॉट प्रत्यक्षात नर्मदा विकास विभागाच्या नकाशावर अस्तित्वात नाही. त्यामुळे आज संतप्त प्रकल्पबधितांनी नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीत आंदोलन करत गट नं ४६६ जेसीबीने जमीन सपाट करून घरप्लॉटचा ताबा घेतला.
यावेळी आंदोलकांनी ढोल वाजवत 'शासनवालो सून लो, आज हमारे गाव मे हमारा राज... कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही... हम हमारा हक जानते, नहीं किसींसे भीक मांगते...' अशा घोषणा देत गावातून रॅली काढली. तसेच यावेळी सुमारे १०० प्रकल्पबाधितांनी जागेचा ताबा घेतला.