नंदुरबार - कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस खरेदीला वेग देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले पालकमंत्री पाडवी यांनी देखील याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळाद्वारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जिल्ह्यात 16 हजार शेतकऱ्यांकडील 4 लाख 24 हजार 907 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या कापसाची किंमत 229 कोटी 3 लाख 43 हजार एवढी आहे.
लॉकडाऊनपूर्वी केवळ 2 लाख 97 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. लॉकडाऊननंतर तांत्रिक अडचणींमुळे व आवश्यक कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने खरेदी प्रक्रीया काही काळ थांबली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी तांत्रिक अडचणी दूर करून खरेदी प्रक्रीया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांनी कापूस खरेदी केंद्रालाही भेटी दिल्या. लॉकडाऊन कालावधीत खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुमारे साडे चार हजार शेतकऱ्यांकडील 1 लाख 26 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यांची एकूण किंमत 67 कोटी 54 लाख रुपये आहे.
सीसीआयच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यात आला असून नंदुरबार तालुक्यातील 7 हजार 44 शेतकऱ्यांकडील 1 लाख 70 हजार 189 क्विंटल, नवापूर तालुक्यात 701 शेतकऱ्यांकडील 24 हजार 442 क्विंटल आणि शहादा तालुक्यातील 8 हजार 260 शेतकऱ्यांकडील 2 लाख 30 हजार क्विंटल असे एकूण 16005 शेतकऱ्यांकडील 4 लाख 24 हजार 907 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी दिली आहे.