नंदुरबार- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केली जाते. जिल्ह्यातील पपई मोठ्या प्रमाणावर परराज्यात विक्रीसाठी जात असते. मात्र, पपई खरेदी करताना परराज्यातील व्यापारी पाहिजे तेवढा भाव देत नसल्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांच्या सामोरे जावे लागत आहे. म्हणून पपईला योग्य हमीभाव देण्याची मागणी शेतकरी शासनाकडे करत आहेत.
पपई उत्पादक शेतकरी अडचणीत
नंदुरबार तालुक्यातील रजाळे गावातील शेतकऱ्यांच्या पपई पिकाला भाव कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला असून शासनाकडे भाववाढीसाठी मागणी केली आहे. १३ मार्चला करण्यात आलेल्या लागवडीतील पपई विक्रीसाठी तयार आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच पीकाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
पपई भावात मोठ्या प्रमाणावर तफावत
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केली जाते. मात्र, पपई खरेदी करणारे व्यापारी कमी असल्यामुळे मनमानी करतात. तसेच पपई खरेदी करताना टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सद्यस्थितीत एका पपईला 4 ते 5 रुपये भाव मिळत असून यातून खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 रुपय भाव मिळायला हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.