नंदुरबार - संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त हाल भिकारी आणि बेघर असलेल्या बांधवांचे होत आहेत. सध्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद आहेत. तसेच नागरिकांचा वावर ही कमी झाल्याने अनेक गरजूंना उपासमारी सहन करावी लागत आहे. ही गोष्ट लक्षात आल्यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने एक विशेष मोहीम सुरू केली आहे. यातून जिल्ह्यात असलेल्या गरजूंना पोलीस दलाच्यावतीने जेवणाची व्यवस्था करून देण्यात येत आहे.
शहादा शहरात स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे हे शहर आणि ग्रामीण भागात फिरून अशा नागरिकांचा शोध घेत आहेत. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत असतानाच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करत आहेत. जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी भिकार्यांना जेवण देण्याआधी साबण आणि सॅनिटायझरने त्यांचे हात स्वच्छ करून देत आहेत. त्यांना चहा, पाणी बॉटल, जेवणाची व्यवस्था पोलीस दलातर्फे केली जात आहे.
पोलीस दलाची ही माणुसकी आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र पाहण्यास मिळेल. उपासमारीची वेळ आलेल्या गरजूंना दोन्ही वेळचे जेवण उपलब्ध करून देत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने एक नवीन आदर्श समाजापुढे उभा केला आहे. पोलीस प्रशासनाचे हे रूप पाहून जिल्ह्यातील नागरिक भारावून गेले आहेत.