नंदुरबार - नवापूर शहरात 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्यानंतर दोन दिवस व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांसह शहरवासियांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला. तसेच खबरदारी म्हणून पुढील १४ दिवस दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता नवापुरात सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळी दुकाने सुरू राहणार आहेत.
नवापूर तालुका वगळता शहरात कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. परंतु, जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या अहवालात नवापूर शहरातील मंगलदास पार्कमधील 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत उपाययोजना करून दोन दिवस व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला व्यापार्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नवापूर तहसिल कार्यालयात तातडीची बैठक प्रशासनाने घेतली. याप्रसंगी नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्षा आरिफ बलेसरीया, तहसिलदार सुनिता जर्हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, आरोग्य अधिकारी शशिकांत वसावे, नगरसेविका बबिता शिंदे, विशाल सांगळे आदी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील लॉकडाऊन वाढवून पुढील 14 दिवसांसाठी वैद्यकीय सेवा वगळता सकाळी 7 ते दुपारी 12 यावेळेत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. औषधाची दुकाने नियमित सुरू राहतील आणि दूध विक्रेत्यांना दूधविक्रीला सायंकाळी 1 तास मुभा राहणार आहे. यावेळी मर्चंट सेवा असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी शासनाच्या आदेशानुसार व्यापारी प्रशासनाला सहकार्य करतील, अशी ग्वाही बैठकीत दिली. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.