नंदुरबार- नगरपालिकेच्यावतीने लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आल्या नंतर शहरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. खरेदी करणाऱ्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या जास्त आहे. शहरात कुठल्याही ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून सकाळी ८ ते १२ च्या काळात नंदुरबार नगरपालिका कर्मचारी शहरात फिरून जनजागृती करीत आहेत.
जनजागृतीदरम्यान मास्क न घालणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर, योग्य शारीरिक अंतर न ठेवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना व हात लॉरी धारकांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या काळात नागरिक, व्यापारी व लॉरी धारक सोशल डिस्टन्स किंवा मास्क न लावता आपला व्यवसाय करताना दिसत होते. यावेळी नंदुरबार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येऊन नागरिकांना व व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क लावणे अशा सूचना दिल्या.
सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. वारंवार सांगून देखील ज्यांनी ऐकली नाही अशांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, १२ वाजल्या नंतर नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने शहरात सर्वत्र व्यवसाय बंद झाल्यानंतर साफसफाई करण्यात येत आहे.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यात गेलेल्या नंदुरबार येथील ४८० मजुरांची घरवापसी