नंदुरबार - खानदेशात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बळीराजा सोबत राबणाऱ्या सरजा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव पोळा सणाच्या तयारीला लागले आहेत. पोळ्यानिमित्त नंदुरबारमधील बाजारपेठा सजलेल्या दिसत आहेत.
तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, पोळ्याच्या दिवशी कुंभार बांधवांनी काळया मातीपासून तयार केलेल्या बैलांची पूजा करण्याची परंपरा कायम आहे. बैलपोळा सण उद्या म्हणजेच शुक्रवारी आहे. त्यामुळे बाजारात कुंभार बांधवांनी तयार केलेले मातीचे बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
शहरात मातीच्या बैलांची पूजा केली जाते. मात्र, गाव पाड्यात आपल्या सरजा-राजाची जोडीला सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. यामध्ये गोंडा, नथ, मुखुट, घुंगरू, गळपट्टा, शिंगांना लावण्यासाठी रंग आदी वस्तूंची खरेदी केली जात आहे.
बळीराजाने दुष्काळी परिस्थितीत जनावरांचा सांभाळ करत वरुण राजाकडे चांगल्या पावसाची आस धरली होती. वरुणराजाने बळीराजाची प्रार्थना ऐकली आणि यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे आता शेतकरी बांधव बैलपोळा सण उत्साहाने साजरा करण्याच्या तयारीला लागले आहे.