नंदुरबार - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या विविध शेतीमालाला आणि प्रक्रिया केलेल्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी, त्याचसोबत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पाचदिवसीय जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी, महिला बचत गट, गट शेती करणारे शेतकरी यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांनी पिकवलेला मालाला योग्य भाव मिळावा म्हणून नेहमी राज्य शासन प्रयत्न करीत आहे एकाच ठिकाणी जिल्हाभरात पिकवला जाणारा मालाला बचत गटांनी प्रक्रिया केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बियाणांच्या संदर्भात माहिती व्हावी, म्हणून असे कृषी प्रदर्शन राज्यभर भरवण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले जात असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
पिकवलेल्या मालाला थेट बाजारपेठ मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांनी आपल्या नवीन तंत्रज्ञान आणि निविष्ठा प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल लावले आहेत. आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध होत असल्याने अशा प्रदर्शनाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना एकाच दालनात आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीचा हा प्रयत्न चांगला असला तरी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करण्यात कमी पडत असल्याची चिन्हे या प्रदर्शनातून दिसत आहे.