नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेल्या 9 जणांनी कोरोनावर मात करून संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील सहा जण व जिल्हा रूग्णालयातील दोन कर्मचारी आणि शिंदखेडा तालुक्यातील एक पुरुष कोरोनामुक्त झाले आहेत. वैद्यकीय उपचारानंतर अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्यातील 9 जण संसर्गमुक्त झाले आहेत. यात एका 6 वर्षांच्या चिमुकलीनेही कोरोनावर मात केली आहे.
संसर्गमुक्त होऊन घरी परतलेल्यांचे नागरिकांनी टाळ्यांचा गजरात आणि फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. तसेच रुग्णालयातून पाठविताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांनीही स्वागत केले. जिल्ह्यात आता तीन बाधितांवर उपचार सुरू आहेत.
नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालेला असताना नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे मुंबईहून आलेला 66 वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळला होता. या बाधिताच्या संपर्कात आल्याने रजाळ्यातील पाच जणांना आणि शिंदखेड्यातील एका 35 वर्षीय पुरुषासह जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आठ दिवसांत कोरोनाचे 9 रुग्ण आढळले होते. यात एका 6 वर्षीय बालिकेचाही समावेश होता. कोरोनाबाधित आढळलेल्या 9 जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णांनी उपचाराला साथ दिल्याने 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. कोविड संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांत रजाळे रेथील सहा वर्षांच्या चिमुकलीसह 28 वर्षीय व 55 वर्षीय महिलांचा तसेच 31, 35 आणि 66 वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे.
शिंदखेडा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारी देखील संसर्गमुक्त झाले आहेत. एकाच दिवशी 9 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. भोरे, डॉ. के. डी. सातपुतेसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. रुग्णवाहिकेतून रजाळ्यातील सहा, जिल्हा रुग्णालयातील दोन आणि शिंदखेडा तालुक्यातील एकाला संसर्गमुक्त झाल्याने घरी पाठविण्यात आले. या रुग्णांचे घरी आगमन होताच नागरिकांनी टाळ्यांचा गजर व पुष्पवर्षाव करून स्वागत केले. एकाच कुटुंबातील बाधित सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह येऊन संसर्गमुक्त झाल्याने रजाळेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, 45 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून, 40 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 28 असून 3 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अन्य 3 कोरोनाबाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कोरोना हा उपचाराअंती रोग बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयांत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.