नंदुरबार - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, त्यासाठी प्रशासनाने वेळा निश्चित केल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी संयुक्तपणे दिले आहेत.
केमीस्ट, मेडीकल दुकान, किराणा, भाजीपाला, पिठाची गिरणी, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस एजन्सी, इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडाऊन, गोदाम, वेअर हाऊस यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
या वेळेतच निवडक बाबी सुरू राहतील -
- बेकरी, रेस्टॉरंट, हॉटेल्स सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
- दूध विक्री केंद्र सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या कालावधीत सुरू राहतील
- अंडी, चिकन, मटन व मासे विक्रेते आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार विक्री करतील
- पशु उपचाराची औषध व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 आणि कृषी विषयक खते व खाद्यतेलाची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील
जिल्हाधिकाऱ्यांचे इतर आदेश आणि सुचना -
स्वस्त धान्य दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत, अशा वाहनांवरील चालक व इतर कर्मचाऱ्यांनी वाहन सोडून इतरत्र फिरू नये व गर्दी करू नये. हातगाडीवरील फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते हे गरजेनुसार गावात फिरून फळ व भाजीपाला विक्री करू शकतील. तसेच एका वेळी एकाच व्यक्तीस माल देतील अशावेळी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी. किराणा दुकानदारांनी शक्यतो व्हॉट्सॲपवर यादी घेऊन घरपोच सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. ग्राहक गर्दी करून उभे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी वर नमूद सर्व दुकानावरून साहित्य खरेदी करताना ग्राहकाने दोन व्यक्तींमधील अंतर किमान एक मीटर ठेवणे आवश्यक असून, त्यासाठी दुकानदारांनी निश्चित अंतरावर चिन्हांकन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.