नंदुरबार - शहरातील ३६ रुग्णांसह जिल्ह्यात ४७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. या ४७ रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांची संख्या १५४ वर गेली आहे. रहिवाशांसोबतच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्गही मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
यामध्ये नंदुरबारमध्ये ३६ जण, सैताणे येथे ७ तर तळोदा व शहादा येथे प्रत्येकी २ रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांंपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहेत. शहरातील कोकणीहिल, ज्ञानदिप सोसायटी, गिरीविहार सोसायटी, मंगळबाजार या भागात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तसेच नंदुरबार जिल्हा रूग्णालयातील तब्बल ७ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. कोकणीहिल भागातील रूग्णवाहिका सुपरवायझरच्या संपर्कातील ३४ वर्षीय महिला, २ वर्षीय बालक पॉझिटीव्ह आढळले आहे. शहरातील अनेक रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कातील आलेले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५२ जणांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी आढळलेल्या ४७ रूग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडून बाधितांच्या वास्तव्याचा परिसर कंटेटमेंट झोन करुन सील करण्यात आला आहे. वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण आपल्या घराबाहेर पडू नये, असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.