नंदुरबार - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीच वाली राहिले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. मात्र आता शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी पालकमंत्री ना. जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावित, डॉ. विजयकुमार गावित, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते. राजेंद्रकुमार गावित यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा- वनहक्क कायद्या अंतर्गतचे जमिनीचे दावे वर्षभरात मार्गी लावू - मुख्यमंत्री
राजेंद्र कुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे डॉ. विजयकुमार गावित यांचे लहान बंधू व खासदार डॉ. हिना गावित यांचे काका आहेत. गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला व गावित परिवाराला त्याचा फायद होण्याची शक्यता आहे.