नंदुरबार - केंद्र सरकारने सरदार सरोवर प्रकल्पात 138.68 मीटरपर्यंत पाणीसाठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नर्मदेच्या जलस्तरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिणामी अक्कलकुवा तालुक्यातील ९ गावांमधील जवळपास १०० घरे आणि शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे या भागातील आदिवासींचे जनजीवन प्रभावित होत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मुखरी मनिबेली, डनेल गमन यासह अजून 6 गाव वाढत्या जलस्तरामुळे प्रभावित होत आहेत. या गावातील 100 पेक्षा अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत, तर शकडो एकर जमिनीवरील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. नर्मदा बचाव आंदोलनाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जीवन शाळेजवळ पाणी आल्याने 141 विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे जगावे कसे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.
नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्यांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
विकासाच्या नावाने बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणात महाराष्ट्रातील 33 गावे बाधित झाली आहेत. मुखडी गावात नर्मदा विकास विभागाने साधे पत्र्याचे शेड देखील बांधले नाही. शासनाचा आपत्ती व्यवस्थापनाचा फज्जा उडाला आहे. नर्मदा विकास विभागाची एकसुद्धा बोट तसेच मदत कार्य करणारे उपस्थित नाहीत. घरे बुडाली, काही घरांजवळ पाणी आले. नर्मदेत मगरींचे प्रमाण जास्त आहे. शिवाय विषारी साप देखील जास्त आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आहे. कधी कुणाच्या घरात साप, मगर घुसेल याचा नेम नाही. कुणाच्याही जीवाचे बरेवाईट होऊ शकते. याला कोण जबाबदार असणार? असा सवाल नर्मदा बचाव आंदोलनाच्यावतीने उपस्थित केला जात आहे.
नर्मदा धरणाची पाणी पातळी 133.38 मीटरपर्यंत वाढली
एकूणच नर्मदानदी काठावरील परिस्थती भयानक आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग आहेत. या भागातील आदिवासी आपल्या न्याय हक्कासाठी किती दिवस लढा देत राहणार? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.