नंदुरबार - वाळुच्या डंपरमधुन गुजरात राज्यातुन आणलेल्या विमल गुटख्याची वाहतूक नंदुरबारमार्गे केली जात होती. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचुन वाळुचा डंपरला शिताफीने पकडुन साडेनऊ लाखाचा विमल गुटखा व तंबाखुचा साठा जप्त केला आहे. विमल गुटखा व डंपरसह तब्बल 34 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा वाहतुक व विक्रीला बंदी आहे. मात्र, गुजरात राज्यातील निझर येथून गुटख्याची नंदुरबारमार्गे वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यांनी पथकासह रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील निझर रस्त्यावर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा रचला. यावेळी 1.30 वाजेच्या सुमारास निझर गावाकडून डंपर आल्याने पोलिसांनी त्यास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा दिला. परंतु चालकाने वाहन न थांबविता वेगात पळ काढला. पोलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने डंपरला थांबवित चौघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना विचारपूस केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा व तंबाखुजन्य अंमलीपदार्थ आढळुन आले. सदरचा गुटखा डंपरमालक नरेंद्रसिंग राजपूत यांचा असून त्यांनी गुजरात राज्यातील निझर येथुन होलाराम सिंधी यांच्या गोडाऊनमधुन भरुन कोठे उतरवायचा याविषयी नंदुरबारला पोहोचल्यावर सांगणार होते, असे संशयितांनी सांगितले. पथकाने वाळु डंपरमधुन (क्र.7100) वाहतूक होणारा 7 लाख 73 हजार 600 रुपये किंमतीचा विमल पानमसाला गुटख्याचे 30 खाकी रंगाचे पोते, 1 लाख 88 हजार 400 रुपये किंमतीचे व्ही-1 तंबाखुचे 6 पांढर्या रंगाचे पोते असा गुटखासाठा तर 25 लाख रुपये किंमतीचा डंपर व 25 हजाराचे इतर साहित्य असा एकुण 34 लाख 67 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आकेश काशिनाथ नाईक, मनिष गणेश ठाकरे, नरेश विनोद पाडवी, राहुल भिका पाडवी (सर्व रा.नळवा बु.ता.नंदुरबार) या चौघांसह डंपरमालक नरेंद्रसिंग राजपूत व होलाराम सिंधी या 6 जणांविरुध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा मुद्देमाल उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, हेड कॉन्स्टेबल प्रदीपसिंग राजपूत, दिपक गोरे, पोलीस नाईक युवराज चव्हाण, अविनाश चव्हाण, पुरूषोत्तम सोनार, शोएब शेख यांच्या पथकाने केली.