नंदुरबार - शहरात संचार बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंगवॉकला बाहेर पडत असल्याचे चित्र होते. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय नंदवळकर गेल्या तीन दिवसापासून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. मात्र, दिवसेंदिवस बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना वारंवार तोंडी ताकीद देऊनही नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करीत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निर्दशनास येत होते. त्यातच मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने मॉर्निंग वॉकला करणाऱ्यांवर नजर फिरवली. शहर पोलिसांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणार्या पन्नास जणांना ताब्यात घेतले. यात शहरातील उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू नागरिकांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संचार बंदीच्या काळात संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी दिला.