नंदुरबार- 'गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्याहो जरा..!' या ओळी माहीत असतील, पण याचा प्रत्यय शहरात अनुभवायला आला आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील अनेकांचा रोजगार बुडाला आहे, तर काहींना उपशीपोटी राहून दिवस काढावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या १ हजार कुटुंबीयांना जिल्हा पोलिसांनी ८ दिवस पुरेल इतक्या किराणा साहित्याचे वाटप केले आहे.
शहराच्या बाहेर असलेल्या झोपड्यांमध्ये अनेक परप्रांतीय मजूर व त्यांचे कुटुंब राहतात. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, संचारबंदीमुळे हाताला काम नाही आणि पोटाला भाकर नाही, अशी त्यांची गत झाली आहे. आपल्या लहान मुलांसह उपाशी झोपण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. या कुटुंबांकडे अन्नधान्य नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला मिळालेली बक्षिसांची रक्कम या कुटुंबांच्या किराण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या रक्कमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भर घातली आणि जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींची मदत घेत या कुटुंबाना दिलासा दिला.
...असा झाला निर्णय
पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी वरिष्ठांकडून शाबासकीसह आर्थिक स्वरुपात पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराच्या रकमेतून अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबीयांना किमान ८ दिवस पुरेल एवढा शिधा देण्याचा निर्णय घेतला. याला वरिष्ठांनी देखील साथ देत होकार दिला आणि गरीब कुटुंबीयांना शिधा वाटप करण्यात आले.
यावेळी पोलिसांची कडक कारवाई आणि शिस्त पाहणाऱ्या कुटुंबीयांना पोलिसांच्या माणूसकीचे दर्शन झाले. पोलिसांची ही कामगिरी पाहून गरीब कुटुंबीयांचे मन भारावून गेले. या उपक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे किशोर नवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा- जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान