नंदुरबार - शहरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे वाहतुकीला अडथळा करताना दिसत आहेत. मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातात महिनाभरात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे, अनेक जण जखमीही झाले आहेत. या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, याकडे वाहतूक नियंत्रण शाखा आणि महानगरपालिकेने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शाळेच्या परिसरात, बाजारपेठेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर असतो. मोकाट जनावरांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र नेहमीच शहरात पाहण्यास मिळते.
हेही वाचा - जळगावातील किशोर चौधरी खून खटला: एकास जन्मठेप, तिघांना 2 वर्षे कारावास
या जनावरांवर आणि त्यांच्या मालकांवर नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहण्यास मिळते. वेळोवेळी तोंडी आणि लेखी निवेदने देऊनही मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी दिली.