नंदुरबार Sarangkheda Bridge Damaged : नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा पुलाला संततधार पावसानं मोठं भगदाड पडलंय. त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आलीय. सारंगखेडा येथील तापी नदीवर ब्रिटिशकालीन पूल बांधण्यात आला होता. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूय. त्यामुळं तापी नदीला मोठा पूर आला. यादरम्यान तापी नदीवरील पुलावर मोठं भगदाड पडल्यानं वाहतूक ठप्प झालीय. घटनास्थळी प्रशासन आणि पोलीस दाखल झाले आहेत. दोंडाईचा बाजूनं पुलाच्या येणाऱ्या भागातील भरावा वाहून गेल्यानं पुलाला भगदाड पडलंय. (sarangkheda bridge)
घटनास्थळी प्रशासन दाखल : सारंगखेडा पुलाला भगदाड पडल्यामुळं एकच खडबड उडालीय. घटनास्थळी शहादा तहसीलदार व पोलीस प्रशासनानं धाव घेतलीय. पुलावरील वाहतूक बंद केलीय. दोंडाईचा पोलीसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलीसांनी अनरद बारी जवळून वाहतूक वळवली. पुलावरील रस्त्याला तडे देखील पडल्याचं चित्र आहे. गेल्याच वर्षी पूल बंद करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुरुस्ती केली होती, असं असताना भराव वाहून भगदाड पडल्यानं कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ( sarangkheda bridge damaged traffic on this road)
तापी नदीला धोक्याची पातळी : सध्या तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पुर परिस्थिती निर्माण झालीय. तापी नदीच्या काठच्या गावानं नंदुरबार प्रशासनानं सतर्कतेच्या इशारा दिलाय. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळं तापी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 111 मीटर तापी नदीची धोक्याची पातळी आहे. सध्या 110 मीटरपर्यंत तापी नदीची पातळी सुरू आहे.
शंभरपेक्षा अधिक वर्ष जूना पूल : तापी नदीवर सारंगखेड्याजवळ हा पूल शंभरपेक्षा अधिक वर्ष जूना आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला या पुलामुळं जोडण्यात आलंय. धुळे जिल्ह्यातील टाकरखेडाच्या बाजूनं आज पुलाचा भराव खचून वाहून गेलाय. त्यामुळं पुलाला खड्डे पडले. याच्या लगतच्या रस्त्याला देखील मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. गावकऱ्यांनी धोका लक्षात येताच पुलावरची वाहतूक स्वत:हून बंद केली.
हेही वाचा :