नंदुरबार - अक्कलकुवा येथील एक महिला, शहादा येथील एक तरुण आणि एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या अहवाल प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे सुरू आहे. दरम्यान, यापैकी अक्कलकुवा येथील कोरोना पॉझिटिव्ह असणारी महिला व तिचे पती हे दाम्पत्य तळोदा येथे शिक्षक असल्याने व त्यांच्या हस्ते शालेय पोषण आहाराचे वाटप झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने खबरदारी म्हणून त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी सुरू असून 4 जणांचे स्वॅब धुळे येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अक्कलकुवा येथे कोरोना पोझिटिव्ह आढळलेल्या महिला व तिचे पती हे दाम्पत्य तळोदा येथे एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने या कालावधीत ते दाम्पत्य त्यांच्या मूळगावी मालेगावी येथे गेले होते. मात्र, शिक्षण विभागाकडून शहरी भागात शालेय पोषण आहार वाटपाकरिता या शिक्षक दाम्पत्यास शिक्षण विभागाच्या आदेशानव्ये कर्तव्य बजावण्यास बोलविण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि 17 एप्रिलला तळोदा येथे शाळेवर दाखल झाले. दरम्यान, त्या महिला शिक्षिकेची प्रकृती बरी नसल्याने व सोबत लहान मुले असल्याने त्या राहत्या घरी अक्कलकुवा येथे निघून गेल्या.
या कालावधीत त्या शिक्षकाच्या हस्ते 47 विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहाराचे वाटप झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने त्या 47 जणांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून इतर संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे सुरू आहे.
त्या महिला शिक्षिकेस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तहसीलदार पंकज लोखंडे, सहायक आरोग्य जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी बैठक घेऊन त्या शिक्षकांच्या सपर्कात आलेल्या 1 शिक्षक व 3 मदतीनीस महिला असे एकूण 4 जणांना नंदुरबार येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांचे नमुने धुळे येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना आमलाड येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने 22 ते 24 या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली असून संशय असलेल्या परिसरात तीनवेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. यासोबतच परिसरातील प्रत्येक घरात वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात बॅरेकेडींग करण्यात आले आहे. या परिसरात वाहनांना पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. कोविड- 19 चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांना स्पर्श न करणे, वारंवार साबणाने हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे स्वच्छ धुणे, दोन व्यक्तीत किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे आदी उपययोजनांवर भर द्यावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.