नंदुरबार - महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले समन्वयक अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक रंजन कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुमाध्यम सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
हेही वाचा - नाशकात शिवसेना नेत्याने घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट; उलट-सुलट चर्चेला उधाण
कुमार म्हणाले की, आयोगाच्या सुचनेनुसार मतदान कक्षात टेबलची मांडणी करावी. स्ट्राँग रुममध्ये जाताना मोबाईलचा उपयोग करू नये. दिव्यांग मतदारांना आवश्यक किमान सुविधा देण्यात याव्यात व त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार सहायकाची नेमणूक करण्यात यावी. भरारी पथकातील कॅमेरामन व छायाचित्रकाराला योग्य सुचना देण्यात याव्या. मतदारांना नियोजित वेळेत मतदार स्लिपचे वाटप होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच वितरीत न झालेल्या स्लिप जमा करण्याची जबाबदारी बीएलओ यांचेकडे सोपवावी. मतदान शांततेत होईल आणि मतदानाची टक्केवारी अधिक राहील असे प्रयत्न सर्व अधिकार्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - 'राफेलची पूजा केली तर काय चुकलं?, हा आमच्या श्रद्धेचा भाग'
तर प्रमुख मार्गावरून अवैध दारु, प्रलोभनासाठी देण्यात येणार्या भेटवस्तू व शस्त्रांच्या वाहतूकीवर विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. मतदारांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी संवादकौशल्याचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करण्यात येणार्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. यावेळी सादरीकरणाद्वारे मतदान तयारीची माहिती देण्यात आली. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी मतदानासाठी करण्यात येणार्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तर विजयकुमार गौडा यांनी ‘स्वीप’ कार्यक्रमाची माहिती दिली. बैठकीला निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध समित्यांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.